प्रमुख कार्यक्रम – उपक्रम

शाश्र्वत ग्राम विकास प्रकल्प

नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास, वारंवार पडणारे दुष्काळ, शेतीतील वाढता खर्च आणि घटते उत्पन्न, गरिबी,बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या; यांबरोबरच अस्वच्छता, अनारोग्याचे वातावरण व मुलभूत सोयीसुविधांचा अभाव अशा अनेक कारणांमुळे ग्रामीण भागाची परिस्थिती चिंता करण्याजोगी झालेली आहे. यावर मात करण्यासाठी लोकसहभागातून नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनाबरोबरच मुलभूत सोयीसुविधांच्या पूर्ततेचे कार्य वनराई करत आहे.

पाणलोट व्यवस्थापन, वृक्षलागवड, शाश्र्वत शेती, पशुधन विकास, मुलभूत शिक्षणसुविधा, कौशल्यविकास,उपजीविका, महिला सक्षमीकरण, स्वच्छता व आरोग्यविषयक सोयीसुविधा इत्यादी घटक केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण भागात वनराई विविध उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीतून स्वच्छ, हरित व संपन्न गावांची निर्मिती करणे हे वनराईचे मुख्य उद्दिष्ट आहे.

पर्यावरण वाहिनी

शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे संस्कार रूजवण्यासाठी २००२मध्ये ‘वनराई पर्यावरण वाहिनी’ (वनराई इको क्लब्स) या उपक्रमाची स्थापना करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत शालेय शिक्षकांना पर्यावरणविषयक समस्या-उपाययोजना, जागतिक तापमानवाढ, हवामानात होणारे बदल यांविषयी अद्ययावत माहिती मिळावी याकरता वनराईच्या माध्यमातून दरवर्षी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले जाते. या कार्यशाळेत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ व नामवंत अभ्यासक, पर्यावरणवादी कार्यकर्ते हे सारे शिक्षकांशी संवाद साधतात. तसेच शाळेमध्ये केलेले
पर्यावरणविषयक प्रकल्प व विविध अभिनव उपक्रम यांविषयीच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी दर महिन्याला शिक्षकांची बैठक आयोजित केली जाते. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी आंतरशालेय पर्यावरण सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धेतील विजेत्या संघांना तीस हजारांची रोख पारितोषिके, वनराई करंडक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येते. या स्पर्धेची अंतिम फेरी पाहण्यासाठी नामवंत व्यक्तींना आमंत्रित करून त्यांच्या अनुभवकथनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. या उपक्रमाद्वारे पर्यावरण-संवर्धनाचा विचार आज घराघरांत पोहोचवण्यात येत आहे. आजवर दोन लाखांहून अधिक शालेय विद्यार्थी या उपक्रमाशी जोडले गेले आहेत.

कार्यशाळा, चर्चासत्रे, प्रशिक्षण

समाजप्रबोधन व जनजागृती करण्याच्या उद्देशाने विविध कार्यशाळा, सभा, शिबिरे, चर्चासत्रे व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदा यांचे आयोजन वनराईच्या वतीने केले जाते. यामध्ये जल-मृदासंवर्धन, शेती व पूरक उद्योग,वनीकरण, पडीक जमिनींचा विकास असे विषय केंद्रस्थानी असतात. याशिवाय शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी, तसेच रोजगार-स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने ग्रामीण तरुणांच्या कौशल्यविकासासाठी ग्रामीण भागात वनराईची प्रशिक्षण केंद्रे कार्यरत आहेत.

जलसंवर्धन पंचायत – एक लोकचळवळ

महाराष्ट्रामध्ये वारंवार पडणाऱ्या दुष्काळाच्या पार्श्र्वभूमीवर २०१६ मध्ये ‘वनराई’ने ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ यांच्या संयुक्त सहकार्याने ‘जलसंवर्धन पंचायत – एक लोकचळवळ’ हे अभियान हाती घेतले. दुष्काळ- निर्मूलनाच्या उद्दिष्टाने प्रेरित स्थानिक नेतृत्व प्रत्येक गावामध्ये निर्माण झाले, तर दुष्काळग्रस्त गावांचे चित्र बदलायला वेळ लागणार नाही. या स्थानिक नेतृत्वाच्या पुढाकारातून पावसाच्या पाण्याचे मोजमाप, नियोजन, व्यवस्थापन व संवर्धन करणारी व्यवस्था गावपातळीवर उभी करता येईल. याशिवाय मृदासंवर्धनाच्या, कुरणविकासाच्या व वृक्षलागवडीच्या कार्यक्रमांना चालना देता येईल; तसेच कमी पाण्यात येणारी पिके घेण्यास आणि
सूक्ष्म सिंचनाच्या वापरास शेतकऱ्यांना प्रवृत्त करता येईल. या दृष्टीकोनातून गावोगावी स्थानिक नेतृत्व निर्माण करून त्यांना सक्रिय करण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले. जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने या लोकचळवळीचे औपचारिक उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते झाले.  रायगड,रत्नागिरी, सातारा, नाशिक व जालना या जिल्ह्यांमधील ६५ गावांमध्ये संपूर्ण वर्षभर हे अभियान राबवण्यात आले.

कोणत्याही प्रकारचा शासकीय निधी न वापरता केवळ स्थानिक स्वयंसेवी संस्थांचा आणि ग्रामस्थांचा सहभाग या बळावर हे अभियान यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. २०१६-२०१७ या कालावधीत राबवण्यात आलेल्या या अभियानाच्या पहिल्या टप्प्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या दांडगुरी (जि. रायगड), बाजार वाहेगाव (जि. जालना) आणि मुळेगाव (जि.नाशिक) या तीन गावांना मा. मुख्यमंत्री श्री. देवेद्र डणवीस यांच्या हस्ते ५ जून २०१७ रोजी सन्मानित करण्यातआले. आगामी काळात या अभियानाची व्याप्ती वाढवून महाराष्ट्राला जलसमृद्ध करण्याचा वनराईचा संकल्प आहे.

प्लास्टिक कचरा व ई-कचरा व्यवस्थापन

घनकचरा व्यवस्थापन हे शहरांपुढील एक मोठे आव्हान बनले आहे. शहरी कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक असते. गेल्या काही वर्षांत ई-कचऱ्याचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढत आहे. त्यामुळे घातक विषारी घटक उत्सर्जित करणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याला व ई-कचऱ्याला कचराकुंड्यांऐवजी व डम्पिंग ग्राउंडऐवजी प्रक्रिया उद्योगांच्या दिशेने वळविण्याचा हा उपक्रम आहे. यातून शहरातील कचऱ्याची गंभीर समस्या दूर होऊ शकते आणि उद्योगांसाठी कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो. हा विचार केंद्रस्थानी ठेवून ‘वनराई’च्या पुढाकारातून आणि पुणे महानगरपालिका, शाळा, रहिवासी सोसायट्या, प्लास्टिक प्रक्रिया उद्योग यांच्या संयुक्त सहकार्याने पुणे शहरात एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे.

‘प्लास्टिक कचरामुक्ती व ई-कचरामुक्ती’साठीच्या या उपक्रमाचा पहिला टप्पा शाळांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात केवळ प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनाला लक्ष्य करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी आपल्या घरातील प्लास्टिक कचरा शाळेत आणतात आणि त्या ठिकाणच्या ‘प्लास्टिक संकलन पेटी’त टाकतात. शाळेमध्ये जमा होणारा हा प्लास्टिक कचरा साधारण पंधरा दिवसांनंतर पुनःचक्रीकरणाकरता (forrecycling) प्लास्टिकवर प्रक्रिया करणार्‍या कंपन्यांकडे पाठवला जातो. या कंपन्या प्लास्टिक कचऱ्यापासून विविध उत्पादने तयार करतात. शाळांप्रमाणेच मोठमोठ्या रहिवासी सोसायट्या, इस्पितळे, विद्यापीठे व महाविद्यालये इत्यादी स्तरांवरसुद्धा अशा प्रकारची यंत्रणा कार्यान्वित करून या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. या उपक्रमातून शहरातील प्लास्टिक कचरा संकलन-व्यवस्थापनासाठी सक्षम यंत्रणा उभी राहिल्यानंतर याच यंत्रणेअंतर्गत ई-कचरा संकलन-व्यवस्थापनदेखील हाती घेतले जाणार आहे. पुणे शहरातील कचऱ्याची समस्या सोडवण्याच्या कामी या प्रयोगामुळे मोठ्या प्रमाणात हातभार लागेल. शिवाय हा प्रयोग देशातील इतर शहरांसाठीही नक्कीच मार्गदर्शक ठरेल. आपणही स्वयंसेवक किंवा देणगीदार होऊन या उपक्रमात सहभागी होऊ शकता.

हरित वारी – पालखी मार्गावर वृक्षलागवड

वारकरी संप्रदायातील ज्ञानेश्वर माउली आणि तुकाराम महाराज यांना महाराष्ट्राच्या संतपरंपरेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. पुणे जिल्ह्यातील आळंदी आणि देहू ही गावे अनुक्रमे माउलींची आणि तुकाराम महाराजांच्या कर्मभूमी. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त आळंदी आणि देहू येथून या संतांच्या पालख्यांसोबत लाखो वारकऱ्यांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेमध्ये विठ्ठलदर्शनासाठी जातात. आळंदी ते पंढरपूर व देहू ते पंढरपूर या पालखीमार्गांवर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना सावली मिळावी, तसेच हा मार्ग प्रदूषणरहित व सदाहरित राहावा यासाठी ‘हरितवारी’ ही वृक्षलागवडीची मोहीम राबवण्यात येत आहे. ‘वनराई’च्या माध्यमातून आणि दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे व इतर संस्था-संघटना यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचा शुभारंभ २०१७च्या पालखी सोहळ्यादरम्यान झाला. या मोहिमेअंतर्गत दोन्ही पालखीमार्गांवरील ठिकठिकाणची स्थानिक परिसंस्था व जैवविविधता विचारात घेऊन देशी वृक्षांची लागवड दुतर्फा करण्याचा मानस आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, स्थानिक नागरिक, बचतगट व स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, गणेश मित्र मंडळ आणि विविध सामाजिक गट यांच्या सहभागातून ही वृक्षलागवडीची मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे. आपणही झाडांचे पालकत्त्व स्वीकारून हरित वारीच्या या उपक्रमाला हातभार लाऊ शकता.

You are donating to : Vanarai Trust

How much would you like to donate?
Rs.100 Rs.500 Rs.1,000
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...