वाटचाल

वाटचाल

स्थापनेमागील पार्श्र्वभूमी

स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे ‘मानव पर्यावरण’ (Human Environment) या विषयावर पहिली जागतिक

पर्यावरणविषयक परिषद १९७२मध्ये झाली. या परिषदेमुळे पर्यावरण या विषयाकडे पहिल्यांदा जगाचे लक्ष वेधले गेले.

केंद्रीय नियोजन मंत्री म्हणून डॉ. मोहन धारिया राष्ट्रीय नियोजनाच्या अनुषंगाने, भारतासमोर असलेल्या विविध

समस्यांचा आणि त्यावरील उपाययोजनांचा अभ्यास त्या वेळी करत होते. अमर्याद वृक्षतोड, वाढती लोकसंख्या व

प्रदूषण यांमुळे भारताची परिस्थिती चिंता करण्याजोगी झाली होती. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत होता. अशा

पार्श्र्वभूमीवर वनीकरणासाठी आणि हरित भारतासाठी जनआंदोलन उभे करावे हे बीज डॉ. मोहन धारिया यांच्या

मनात रोवले गेले. याचाच अंकुर पुढे ‘वनराई’च्या रूपाने उगवला.

 

सन १९८२ मध्ये डॉ. मोहन धारिया यांनी ‘वनराई’च्या प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केली. महाराष्ट्रातील कृषी

विद्यापीठांना भेटी देऊन तेथील तज्ज्ञांशी चर्चा केली. जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये दौरे केले आणि खेड्यापाड्यांत जाऊन

ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र जवळून पाहिले. ‘वनराई’च्या कार्याची गरज आणि भविष्याच्या दृष्टीने असलेले या कार्याचे

महत्त्व विचारात घेऊन १० जुलै १९८६ रोजी सार्वजनिक विश्र्वस्त कायद्याखाली संस्थेची नोंदणी करून या संस्थेची

मुहूर्तमेढ रोवली गेली.

 

मृदा-जल- वन संवर्धन कार्यक्रम

हरित क्षेत्र वाढविण्यासाठी वृक्षलागवड करणे, वृक्षतोडीला आळा घालणे, वनसंवर्धनाविषयी जनजागृती करणे

असे उपक्रम ‘वनराई’च्या माध्यमातून सुरुवातीच्या काळात राबवले जाऊ लागले; परंतु या कार्याचा विस्तार होत

असताना विशेषतः कमी पर्जन्यमान असलेल्या ठिकाणचे क्षेत्र वृक्षलागवडीखाली आणताना असे प्रकर्षाने जाणवले की,

पाण्याची उपलब्धता वाढवल्याशिवाय त्या ठिकाणच्या वृक्षारोपणाला अर्थ उरणार नाही; म्हणून नंतरच्या काळात

वनीकरणाबरोबरच जलसंवर्धनाचे कार्य हाती घेण्यात आले. मात्र मोठ्या प्रमाणात माती वाहून गेलेल्या व जमिनीची

धूप झालेल्या मुरमाड, खडकाळ माळरानावर झाडे लावण्यासाठी आणि ती जगवण्यासाठी फक्त पाणी असूनही

चालणार नव्हते, म्हणून वनीकरण आणि जलसंवर्धन यांबरोबरच मृदासंवर्धनाचे कार्यही हाती घेतले. अशा प्रकारे ‘माती

अडवा – पाणी मुरवा – झाडे लावा’ हे सूत्र मूलस्थानी असलेला ‘मृदा-जल- वन संवर्धन कार्यक्रम’ लोकसहभागातून

राबवण्यास सुरुवात झाली.

 

पंचसूत्री कार्यक्रम : गावाच्या विकासाची पायाभरणी

मृदा-जल-वन संवर्धनाचे कार्यक्रम राबवण्यासाठी शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागांत अधिक वाव असल्याने

अर्थातच ‘वनराई’ची कामे खेड्यापाड्यांमध्ये सुरू झाली. स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागाशिवाय ही कामे यशस्वी होणार

नव्हती. मात्र दोन वेळच्या अन्नासाठी उन्हातान्हात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकरी-कष्टकऱ्यांनी निःस्वार्थ भावनेने या

कामी आपल्या वेळेबरोबरच श्रमही खर्च करावेत अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे एका अर्थाने त्यांच्यावर अन्याय

करण्यासारखेच होते; म्हणून लोकसहभागातून निर्माण होणाऱ्या साधनसंपत्तीचे अधिकाधिक व समन्यायी लाभ त्या

ग्रामस्थांनाच कसे मिळू शकतील, याचे नियोजन सुरू झाले आणि यातूनच एका अभिनव कार्यक्रमाच्या आखणीचे

काम ‘वनराई’ने हाती घेतले. पाणलोटासह नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन ग्रामस्थांच्या सहभागातून गावपातळीवर

कसे करता येईल; त्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ ग्रामस्थांना कसे मिळू शकतील; गावामध्ये उपजीविकेच्या नव्या संधी

कशा निर्माण होतील; यांबरोबरच मूलभूत सोयीसुविधांच्या उपलब्धतेतून ग्रामस्थांचे आयुष्य अधिक सुखकर कसे

बनवता येईल… असे विविध घटक विचारात घेऊन वनराईच्या सर्वांगीण ग्राम विकास प्रकल्पाचा आराखडा तयार केला

गेला. या आराखडयाच्या केंद्रस्थानी चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, नशाबंदी, नसबंदी व श्रमदान हा ‘पंचसूत्री’ कार्यक्रम होता.

सर्वांगीण ग्रामविकासाला सुरुवात

गावागावांमध्ये ‘माथा ते पायथा’ तत्त्वानुसार लोकसहभागातून पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाची प्रभावी

अंमलबजावणी होऊ लागली. ठिकठिकाणी पाण्याची उपलब्धता वाढत गेली. भूगर्भातील पाण्याची पातळीही वाढू

लागली. मात्र एवढ्यावरच न थांबता, उपलब्ध पाण्याचे गावपातळीवर काटेकोर नियोजन-व्यवस्थापन करून

गावकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि याद्वारे त्यांचे जीवनमान उंचावणे यांवरही भर देण्यात येऊ लागला. शेतकऱ्यांच्या

पारंपरिक ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतीतील उत्पादकतेवर व उत्पादनवाढीवर लक्ष केंद्रित केले.

 

कुरणविकास, वनशेती, फळबाग-लागवड, कुक्कुटपालन, मत्स्योत्पादन, पशुधन विकास, मधुमक्षिका पालन, रेशीम

उद्योग यांबरोबरच शेतमालाच्या मूल्यवर्धनासाठी अन्न व कृषी प्रक्रिया उद्योगांची जोड शेतीला देण्यास शेतकऱ्यांना

प्रवृत्त केले. महिला बचत गटांची उभारणी करून त्यांच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना दिली. शेतकरी मेळावे,

शिबिरे, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून प्रयोगशील शेतकऱ्यांना, होतकरू तरुणांना व महिलांना वेळोवेळी मार्गदर्शन

केले. याशिवाय घर तेथे शौचालय आणि शक्य तेथे बायोगॅस प्रकल्प अशी मोहीम राबवली. स्वच्छतेबरोबरच

गावामध्ये उच्च दर्जाच्या शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि इतर मुलभूत सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर दिला.

 

शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल

श्रमदानातून आणि लोकसहभागातून विकासकामे झाल्याने गावोगावी निर्माण झालेल्या सार्वजनिक

साधनसंपत्तीप्रती गावकऱ्यांमध्ये भावनिक नात्याबरोबरच सामुदायिक मालकीचीही भावना निर्माण झाली. त्यामुळे त्या

साधनसंपत्तीचा वापर ते अतिशय काळजीपूर्वक करू लागले. वेळोवेळी देखभाल-दुरुस्ती करून निगा राखू लागले.

 

गावातील नैसर्गिक संसाधने पुढील पिढ्यांसाठीही कशी राखली जातील याबाबत विशेष काळजी घेऊ लागले. गावाच्या

विकासाने प्रेरित स्थानिक नेतृत्व उदयास आले. यातून दुष्काळी गावांचासुद्धा कायापालट घडून आला आणि शाश्वत

विकासाची गंगा विविध गावांमध्ये वाहू लागली.

खेड्याकडे परत चला!

ज्या गावांतील लोकांना पूर्वी रोजगारासाठी शहरामध्ये स्थलांतर करावे लागत होते, त्या गावांतील लोक

शहरातून पुन्हा आपल्या गावी स्थलांतरित होऊन त्या ठिकाणी शेती व पूरक उद्योग करून सुखी, संपन्न आयुष्य जगू

लागले. ‘खेड्याकडे परत चला’ हा महात्मा गांधींचा संदेश विविध गावांमध्ये प्रत्यक्षात आला. यांपैकी गावडेवाडी (जि.

पुणे) आणि वरंध (जि. रायगड) या गावांचा गौरव देशाच्या तत्कालीन माननीय राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील

आणि तत्कालीन माननीय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही केला. देशाच्या विकासनीतीला नवी दिशा दाखवणारे

हे यश असल्याचे गौरवोद्गार त्यांनी त्याप्रसंगी काढले.

गावांच्या समूहांचा एकत्रित विकास

आता ‘वनराई’ने एक-एक गाव विकसित करण्याऐवजी पंचक्रोशीतील गावांचा समूह आणि त्यांच्या पाणलोट

क्षेत्राचा एकत्रित विकास करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. याद्वारे त्या भागात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य

नियोजन-व्यवस्थापन होईल, तसेच शेतीच्या विकासाबरोबरच कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग व जोडधंदे

मोठ्या प्रमाणात उभे राहू शकतील. शेतमालाची साठवणूक, व्यापार व दळणवळणाच्या सुविधा निर्माण करता येतील.

 

स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील. जेणेकरून रोजगारासाठी

शहराकडे स्थलांतर करण्यापेक्षा लोक आपापल्या गावीच चांगले आयुष्य जगू शकतील. या दिशेने रायगड, रत्नागिरी व

सातारा या जिल्ह्यांत सध्या ‘वनराई’च्या माध्यमातून कामे सुरू आहेत.

स्वयंसेवक, देणगीदार किंवा सी.एस.आर. भागीदार म्हणून आपणही या कार्याला जोडून घेऊ शकता.

You are donating to : Vanarai Trust

How much would you like to donate?
Rs.100 Rs.500 Rs.1,000
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...